मैना मावशी..! Domestic Help to Family member!

Blog च्या निमित्ताने नेहमीच डोक्यात काही न काही सुरु असतं. इकडे तिकडे फिरून, लोकांना भेटून त्यांना जाणून घेण्यात नेहमीच मज्जा येते. पण त्या दिवशी अचानक माझ लक्ष आमच्या ह्या नव्या नायिकेकडे गेलं. खूप दिवसांनंतर घरी आले होते. नेहमीची लग-बग सुरु होती अन आमच्याकडे गेल्या १५-१६ वर्षांपासून कामाला असलेल्या मैना मावशी नेहमीप्रमाणे कामाला आल्या अन मला Blog ची पुढची नायिका मिळाली.
मैनाबाई बाबासाहेब उजगरे. अताशा त्याचं वय सुमारे ४५. सड-सडीत शरीरयष्टी. कष्टाळू, मन-मिळावू, हसऱ्या आणि बेस्ट म्हणजे बोलक्या अशा आमच्या मैना मावशी! ह्या बाईच खरच कौतुक कराव तितक कमीच. गेली १६ वर्षे मी त्यांना पाहतेय. थोड शरीर थकलंय पण बाकी त्या आजही अगदी तशाच आहेत. १९९४-९५ साली आम्ही ह्या भागात नव्यानी राहायला आलेलो तेव्हा तिच्या नवऱ्याला इकडे राखणदारीच काम मिळाल होत. मग आमच्याच प्लॉटच्या मागे झोपडी करून ते राहत आणि घराला हात-भार लागावा म्हणून मैना मावशी जवळपासच्या घरात भांडी-धुनी करत.
त्याचं माहेर माटेगाव , बीड जिल्ह्यातल. कमी वयात लग्न झाल. सासर सावंगी, जालना जिल्ह्यातलं. मुल-बाळ होत नव्हत म्हणून त्या उपचारासाठी त्या काळात धुळ्यात आल्या आणि इकडेच राहिल्या. पुढे मैनाबाईच्या संमतीनं त्यांच्या नवऱ्यानी दुसरं लग्न केल. आपल्या सवतीला, तिच्या मुलांना त्या खूप जपतात, जीव लावतात. मी विचारलं तुमच्यात वाद होत नाहीत का? त्यावर त्या म्हणाल्या - "छोटी-मोठी भांडण तर सगळीचं कड होतात पण तिला मी काय त्रास द्यायचा? एकाच छताखाली रहायचय आपल्याला शेवटी."
स्वतःला शिकता आल नाही म्हणून आपल्या मुलांनी शिकावं अस त्यांना खूप वाटत. त्या साठी त्या खूप झटतात. गेले २५ वर्ष त्या धुळे शहरात आहेत. पूर्वी स्वतःच घर नव्हत तेव्हा त्याचं कुटुंब झोपडीत राहत असे. पैशाची बचत व्हावी म्हणून त्यांनी बचत गट योजनेत भाग घेतला. त्यातून पैसे जमवून दूर गावाबाहेर घर बनवलं. सुमारे ८-१० किलोमीटर दुरून आजही त्या आपल्या पूर्वीच्याच घरात कामाला येतात. कधी सायकलीनं तर खुपदा  पायी सुद्धा.
गप्पा मारता मारता त्या बोलत होत्या आता महागाई खूप वाढलीय. कामाचे पैसेपण वाढून मिळतात पण आता परवडत नाही. वर्षातून एकदा गावाकडे जाऊन येतो.
माझ्याताल कुतूहल प्रश्न विचारातच होत आणि माझ्या प्रत्येक प्रश्नाला मैना मावशी हसून उत्तर देत होत्या. हातातला चहाचा कप खाली झाला तशा त्या उठल्या. कौतुकाने मला जवळ घेऊन मिठी मारली. 'बयो कित्ती मोठी झाली तु. खूप शिका. आई-बापाच नाव करा.' असा भरभरून आशीर्वाद देत त्या पुन्हा कामाला लागल्या.
खर तर त्या आम्हाला आमच्याच घरातल्या एक सदस्य वाटतात. कधी त्यांना एक व्यक्ती म्हणून अस जाणून घेण्याचा वेगळा प्रयत्न केला नव्हता. आज संधी मिळाली. मी हि खुश झाले. कामगार वर्गातील महिलांमध्ये नेतृत्वचा अभाव हा विचार मनात घोळवत article लिहून संपवले.
----------------------------------------------------

मैनाबाई बाबासाहेब उजगरे
ह. मु. - धुळे, महाराष्ट्र