प्रवास एका स्वप्नाचा...

चार वर्षांपूर्वी, Engineering च्या माझ्या शेवटच्या वर्षाला अपघातानेच (?) माझी भेट शितलशी झाली. अगदी किरकोळ शरीरयष्टी, साडेचार फूट उंची पण कायम हसरा अन निरागस चेहरा म्हणजे शितल पवार. पहिल्यांदा भेटलो तेव्हा वाटलंच नव्हत कि ह्या लहान मूर्तीची धडपड इतकी मोठी असेल. 

धुळे शहरातल्या एका सुखवस्तू कुटुंबात शितलचा जन्म झाला. तिची आई, संध्या सहकार खात्यात तर वडील सुधाकर BSNL मध्ये अधिकारी. पवार कुटुंबात पहिली लेक म्हणून शितल लाडात वाढलेली (जरा जास्तीच लाडात). वडिलांची वाचनाची आणि लिखाणाची आवड जणू तिला वारशातच मिळाली. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार आणि त्याचबरोबर पालकांच्या (अति)दक्षतेमुळे १०-१२वीला तिने चांगले मार्क्स सुद्धा मिळवले आणि समाजाने घालून दिलेल्या प्रघाताप्रमाणे शितल पुण्यात MIT ला Computer Engineering ला join झाली. 

धुळ्यासारख्या छोट्या शहरातून अचानक पुण्यात येण, नवीन मित्र मैत्रीणी, शहरी वातावरण, इकडची modern lifestyle  ह्याच्या चांगल्या-वाईट परीणामातुन स्वतःला सावरून बाहेर पडण्याच्या धडपडीतच तिचा एक भयंकर अपघात होऊन उजवा हाथ खांद्यातून मोडला. चार महिन्यांसाठी अंथरुणात पडून तर रहावं लागलंच पण त्या हाताला कायमची कमजोरी आली. त्यात Engineering च वर्षही वाया गेलं. 'life थांबलं माझं आता, असं वाटायचं' शितल सांगते. पण तोच तिच्या life चा खरा turning point होता.

आपल्या रोजच्या धावपळीत आपण जराही उसंत न घेता कशा न कशाच्या मागे धावत असतो. कधी कधी गरज असते ती एका break ची. थोडंसं थांबून आत्मपरीक्षण करण्याची. जे चुकलंय, हुकलंय ते सावरण्याची. काही जण थांबतात पण काहींना थांबवतात ते असे अपघात. 

अपघातानंतर शितलला सक्तीची bed rest असल्यामुळे तिला काहीही काम करण्यापासून मज्जाव होता. अंथरुणात पडून पडून तिला साथ केली ती तिच्या पुस्तकांनी. तिने त्यादरम्यान खूप वाचन केलं. रिकामं मन भूताच घर, असं म्हणतात. मग स्वतःला गुंतवावं म्हणून तिने ब्लॉग लिहायला सुरुवात केली. त्याच दरम्यान शितलने - 'चुरगळलेली पानं' आणि 'ऋणात' हे दोन ब्लॉग्स लिहिले. ब्लॉगला मिळालेल्या प्रतिसादाने तिची वाचनाची आणि लिखाणाची गोडी अजून वाढली. परंतु त्याचवेळी तिला इतरही अनेक प्रश्न भेडसावत होते आणि त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे Engineering नंतर पुढे काय? आत्ता पर्यंत तिला हे तर कळून चुकलंच होत कि Engineering आणि विशेषतः सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करण्याची आवड तिला अजिबात नाही. अशातच नवीन trend नुसार आणि समाजप्रघाताप्रमाणे अधिकारी होण्याचा पर्याय तिला सुचवलं जात होता. पण ह्यावेळी निर्णय घाईत आणि फक्त प्रतिष्ठेसाठी न घेण्यावर ती ठाम होती.  त्याच दरम्यान तिची ओळख धुळे-जळगाव जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील गरजू मुलांसाठी काम करणारया  दीपस्तंभ संस्थेच्या संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांच्याशी झाली. शितल सांगते सरांनी मला पहिल्याच भेटीत सांगितलं, 'तुझ्या आवडी आणि skills ऐकून मला वाटतं तू अधिकारी होण्यापेक्षा TISS ला पुढचं शिक्षण घे.' तोवर तर TISS काय आहे ? Social Work मध्ये Degree मिळते हे सुद्धा तिला माहिती नव्हतं. म्हणून सामाजिक क्षेत्र आणि त्याचा आवाका समजून घेण्यासाठी तिने वाचन सुरु केलं. त्याच बरोबर काही महिने तिने दीपस्तंभसाठी काम केलं. तिथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समस्या तिला जवळून पाहता आल्या. सरांसोबत वयाच्या २२ व्या वर्षी तिला तिच्या पहिल्या पुस्तकासाठी लेखक अन संकलक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ती पुन्हा पुण्यात आली. 

Engineering ला आमची ओळख आणि मैत्री झाली ती आमच्या सामाजिक कामाच्या आवडीमुळे. आम्ही आमच्या मित्रांसोबत 'मानव्य' नावाच्या संस्थेला दर weekend ला आवर्जून जायचो. माझा हट्ट असायचा, तिथल्या चिमुकल्यांसाठी आणि शितलही न चुकता यायची माझ्यासोबत. 'मानव्य' जरा पुण्यापासून आडवळणाला म्हणून friends च्या bikes चा जुगाड करावा लागायचा पण कधी ती सोय नाही झाली तर भाजी नेणाऱ्या tempo मधेही आनंदात बसून यायची शितल. सहसा स्वतःच्या Comfort Zone च्या बाहेर न जाणारी शितू कामाच्या वेळी मात्र नेहमीच स्वतःला झोकून देते. 

पुण्यात परतल्यानंतर तिने TISS साठीची तयारी सुरु केलीच होती. मग सामाजिक चळवळीतली माणसं आणि TISS ला शिकलेली माणसं तिने शोधून काढली. त्यात तिची ओळख डॉ. प्रशांत भोसले सारख्या मित्रांशी झाली. त्यांचं मार्गदर्शन तिला ह्या पूर्ण प्रक्रियेत खूप मोलाचं ठरलं. आपल्या कामाच्या थोड्याश्या अनुभवाला वाचन, चर्चा अन लिखाणातून तिने अजून बळकटी दिली आणि TISS ची परीक्षा तिने उत्तम गुणांनी पास केली. ह्या सर्व घडामोडीं एक मित्र म्हणून मी खूप जवळून पहिल्या. हे सर्व तिला शक्य झालं कारण ती खूप focused होती, त्यासाठी तिने अचूक planning केलं होतं, वेळोवेळी तिने योग्य मार्गदर्शन घेतलं आणि त्याच्या जोडीला होती तिची जिद्द आणि मेहनत. TISS ला जाऊन नवीन विषय तर तिला शिकायला मिळालेच पण त्या दोन वर्षात तिने नेहमीप्रमाणे झोकून देऊन fieldwork केलं. मग मुंबईतील सफाई कामगारांचं आंदोलन असो किंवा ऐन उन्हाळ्यातल दिल्ली-ओडीशा मधला climate change चा शोध निबंध. आपल्या masters च्या thesis साठीही तिने स्वतःच्या गावापासून दूर विदर्भात 'बदलत्या हवामानाचा शेतीवर परिणाम' हा विषय निवडला होता.  TISS च्या दोन वर्षात तीने स्वतःला खूप exposure दिलं. अनेक लोकांना भेटणं, त्यांच्याशी चर्चा करणं, वाचन आणि लिखाण, प्रवास, internships अशातून तिचा अनुभव समृद्ध होत गेला.

प्रवास करणं, नवनवीन लोकांना भेटणं हे तिचे जगावेगळे छंद. विशेष म्हणजे माणसं जोडून ठेवणं तिला भारी जमतं. 

आम्ही मुंबईमध्ये शिकत असतांना खूप वस्त्या पायी फिरायचो अशावेळी तिचं observation खूप sharp असायचं. आमच्या चर्चांमधले तिचे मुद्दे खूप वेगळे असायचे. सामाजिक प्रश्नांबाबत तिची कळकळ कायम जाणवायची. माझ्या कित्ती तरी ideas आणि initiatives ना तीने विरोधही केलेला. एक Social Worker म्हणून व्यवस्थेच्या त्रुटींचा तिला खूप राग यायचा...आजही येतो पण त्याच बरोबर एक Engineer म्हणून ती pragmatic राहून solutions शोधत असते. तिची हीच वृत्ती तिला तिच्या कामात उपयोगी पडते. सध्या ती पुण्यातील INHAF संस्थेसोबत शहरी गरीबांच्या समस्यांवर काम करत आहे. अजून एक नवीन विषय explore करत आहे. कधी कधी तिचा हेवा वाटतो.

आपल्या सर्वांच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आपला करिअर आणि लग्न. दुर्दैवाने नेमकं ह्याच गोष्टीत प्रतिष्ठा, समाज वगैरे विषयांना अधिक महत्व दिल जात आणि तिथेच आपले निर्णय चुकतात. शितलने मात्र स्वतःच्या आवडी-निवडी-कौशल्ये पाहून योग्य निर्णय घेतले. आज संसार सांभाळून ती आपलं काम त्याच dedication ने करतेय. लग्नानंतर सहसा मुलींचं नाव/आडनाव बदलतं, पत्ता बदलतो, ओळख/identity बदलते पण शितलने मात्र स्वतःच नाव तर बदललं नाहीच पण स्वतःची ओळख निर्माण केली. आज शितल आपल्या कामातून व्यवस्थेशी झगडतेय, बहुजनांच्या हितासाठी आणि त्याहून आधी स्वतःच्या समाधानासाठी. 

अशी ही Engineer turned Social Worker येत्या १६ नोव्हेंबर ला पुण्यात storified.me च्या निमित्ताने आपल्या समोर येणार आहे. तिची हि awesome journey  तिच्या तोंडून ऐकण्यासाठी पुण्यात असाल तर नक्की या. 
-------------------------------

शितल पवार 
ह. मु. वाकड, पुणे





















[हा लेख आम्हाला आमचे सहकारी रोशन केदार ह्यांनी लिहून पाठवलाय. धन्यवाद ROS]