हेडमास्तर कदम!




मुंबईमध्ये आल्यानंतर आवर्जून मनाच्या कोपऱ्यात राहिलं ते म्हणजे रात्रशाळेत जाणं. निमित्त होतं प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचं. आजवर कधीही त्या मुलांनी त्यांच्या रात्रशाळेत तो साजराकेला नव्हता. सांस्कृतिक कार्यक्रमही कधीच झाला नव्हता. खरतरं परिस्थितीच नसते. 'मासूम' ह्या संस्थेच्या आणि काही मित्रांच्या पुढाकाराने शेवटी ह्या वर्षी प्रयत्न झाले आणि त्यात यशही आले. ह्यात सर्वात मोठा पाठींबा होता तो शाळेचे मुख्याध्यापक कदम सरांचा.
कदम सर म्हणजे साताऱ्याचा, गावाकडचा रांगडा गडी. पहिलवानाचा मुलगा, म्हणून लाडका, ह्या शब्दात सर त्याचं लहानपणाचं वर्णन सांगायला सुरुवात करतात. त्याचं शिक्षण शहरात पूर्ण झाल. 'Science' करणे म्हणजे चांगले शिक्षण, अशा पारंपारिक सामाजिक प्रघाताप्रमाणे त्यांनी १२वीला Science घेतलं. सर सांगतात कि अज्ञान आणि अर्धवट माहितीमुळे आजही मुले आंधळ शिक्षण घेत आहेत. मेंढराप्रमाणे एकमेकांना Follow करत स्वत:ची लायकी ओळखता मेडीसीन, इंगीनीरिंगला जाणारे खूप विद्यार्थी आहेत.त्यातून मग त्यांना येणारे Depression, Frustration ओघाने आलंच. पण कुणी विचार करत नाही.
लहानपणापासून लाडात वाढलेल्या ह्या निर्धास्त मुलाला वास्तवाची जाणीव झाली ती दहावीत. त्यांच्या शेजारचा एक कुंभाराचा मुलगा, त्यांचा सहपाठी प्रकाश. त्या दिवशी प्रकाशनी डब्बा आणला नाही म्हणून ह्यांनी चौकशी केली तेव्हा त्यानी सांगितल कि त्याच्या बापाला त्या दिवशी रोज मिळाला नव्हता. सर म्हणतात, 'हे माझ्यासाठी खूप नवीन होत. मी असा पहिल्यांदाच ऐकत होतो कि एक दिवस काम मिळाल नाही तर दुसऱ्या दिवशी डबा नाही.' गरिबी त्यांनी पहिल्यांदाच इतक्या जवळून पाहिली.
एकूणच सरांशी बोलतांना जाणवल कि त्यांचं संपूर्ण आयुष्य Thrilling राहिलंय. कॉलेजातल्या राजकीय सहभागाने त्यांना आत्मविश्वास, निर्भीडपणा आणि वक्तृत्व हे गुण बहाल केले. स्वतःबद्दल बोलतांना सर हसून म्हणतात, 'कसे होतो आपण? हसू येतंय आता.'
पुढे वडिलांनी त्यांच्या लग्नासाठी केलेल्या हट्टामुळे ते मुंबईला आले. MPSC मध्ये आलेलं अपयश आणि B. Ed. केल कि लगेच नोकरी ह्या आणखी एका प्रघाताप्रमाणे त्यांनी B. Ed. ला Admission घेतली आणि त्यांना नोकरीही मिळाली. त्यामागे एक कारण घरची जबाबदारी हे ही होत. विद्यार्थ्यांमध्ये मिसळून जायचा त्यांचा स्वभाव, त्यात तरुण वय ह्यामुळे सुरुवातीपासूनच त्यांनी शिक्षक म्हणून लोकप्रियता मिळवली. पैसे कमवायची हीच वेळ म्हणून सकाळी part-time आणि दुपारी पूर्ण वेळ आणि पुन्हा रात्रशाळेत ते काम करत.
त्याकाळात रात्रशाळेत कुणी टिकत नसे. १९८७ साली ते नन्नावरे रात्र शाळेत रुजू झाले. सुरुवातीला त्यांची इच्छा नव्हती पण इकडे २००० रुपये मिळत होते आणि त्याकाळी त्या पैशाला खूप किंमत होती आणि ऐन उमेदीचा काळ, त्यात कामच वेड म्हणून त्यांनी तिकडे काम सुरु केलं. शाळेतल्या मुलांचा टारगटपणा आणि दिरंगाई मास्तरांना शाळेतून पळवून लावत असे. तसलाच काहीसा अनुभव सरांनाही आला. पण त्यांचा जिद्दी स्वभाव! त्यांनी विद्यार्थ्यांना सांगून दिल कि 'शाळा सोडून जाईन पण माझ्या मनानी, तुमच्या त्रासानी नाही!' १९८९ सालीशाळेचा निकाल % लागला. सर म्हणाले कि त्यावेळी मला स्वत:चीच लाज वाटली. १९९० साली ते शाळेचे मुख्याध्यापक झाले. नेतृत्वगुण, कडक शिस्त ह्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांना अनुशासन लावलं. सर म्हणतात, 'प्रामाणिकपणे शिकवलं कि मुल आपोआप वश होतात.' सुरुवातीच्या काळात त्यांनी मुलांना शिस्त लावण्यासाठीखूप चोप दिला. पण नंतर त्यांनाच वाटलं कि हा वेडेपणा आहे. त्यांनी मुलांचं Background जाणून घ्यायला सुरुवात केली. वस्तीत जाण, त्यांच्या घरची परिस्थिती जाणून घेण, विद्यार्थ्यांच्या Priorities काय आहेत हे जाणून घेताना अजून एक दारूण वास्तव सरांच्या समोर आल. कुठे घरातून पळून आलेली मुलं, कुणाच्या आईने दुसरं लग्न केलेलं तर कधी कधी उपाशी पोटी असणारी मुलं. अशात शिक्षण हि त्यांची प्राधान्यता बनण अशक्यच! सर म्हणतात, 'पण हि समज मला जरा उशीराच आली.'
त्यात रात्रशाळा म्हणजे शिक्षकाच्या सोयीनी चालणार. विद्यार्थ्यांचा कुणी फारसा विचार करत नाही. आवेगात सरांनी आम्हालाच विचारल, 'अहो, शाळा कुणासाठी?' रात्र शाळा बदनाम होण्याची कारण देताना ते शिक्षकांच्या मानसिकतेवर ताशेरे ओढतात. सर म्हणतात, 'मुलांच्या पातळीवर जाण, गोष्टी सोप्या करून सांगण जमल पाहिजे. खरा शिक्षक तो ज्याची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहतात. मुल ज्याची कधी तक्रार करत नाहीत. त्यांच्या तासाला वेळ कधी जातो, ते कळत नाही.' सर पुढे म्हणतात, 'एक एक गणित धरून शिकवा, मग बघू मुल कसे fail होतात!' शिक्षकांनी अध्ययनाच काम बेंबीच्या देठापासून करावं, असं कदम सरांच ठाम मत आहे. हेडमास्तरांची जबाबदारी तर त्याहून मोठी. 'प्रसंगी त्यांची विद्यार्थ्यांसाठी भिक मागायचीही तयारी असावी', असंही ते म्हणतात.
मुळातच शिक्षणपद्धती कमकुवत झालेली असतांना, दिवसा पोटाची खळगी भरण्यासाठी वन-वन फिरून आल्यानंतर रात्रशाळेत शिकायला आलेल्या ह्या मुलांना चांगल शिक्षण देण्यासाठी, स्वतःच्या पायावर त्यांना उभे करण्यासाठी ‘We Need Humans In This Profession With Dedication!’
कुणीतरी खरंच म्हटलंय, 'शिक्षक हा जन्मावा लागतो!' खरंय! कदम सर! आमच्या ह्या नन्नावरे रात्राशाळेतल्या मुलांसाठी अहोरात्र झटणाऱ्या कदम सर आणि त्यांच्या टीमला आमचा सलाम!
----------------------------------------------
बी.एस. कदम
हेडमास्तर
. मु. - नन्नावरे रात्रशाळा, वडाळा