आशावादी मार्गदर्शक!

सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु आहेत. सर्वांचीच सुट्टीला कुठे ना कुठे जाण्याची लगबग सुरु असलेली दिसून येते. फेसबुकच्या भिंतीवर काहींचे छायाचित्रही झळकतांना दिसतात. त्यात कोंकण वगैरे जाण आपल्या सर्वानाच फार भारी वाटतं. अशाच कोकणाला लागून पालघर जिल्ह्याजवळ वाडा हा एक दुर्गम भाग. वाड्यापासून २५किमी वर वसलेलं दुगाड हे एक छोटस गाव. ठाण्यापासुन २०-२२ किलोमीटर भिवंडी तालुक्यात दुगाड हे गाव मोडतं. इथल्या ग्रामस्थांच्या बोलीभाषेत कोकणाची छाप चांगलीच दिसून येते. खरं तर मुंबई-ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असूनही हा संपूर्ण भाग विकासाच्या मुख्य प्रवाहापासून आजही कोसो दूर आहे.ह्याच दुगाड गावात आणि परिसरात सध्या एका नवीन शैक्षणिक उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवतोय एक उमदा तरुण कुणाल यशवंत पाटील.

कुणाल यशवंत पाटील... दुगाड गावातील एका सर्वसामान्य मध्यम वर्गीय कुटुंबातला मुलगा. त्याच प्राथमिक शिक्षण गावातच झालं. पूढे इंजिनीरिंगसाठी कुणाल धुळे शहरात ४ वर्षे राहिला. त्याच दरम्यान धुळ्यासारख्या ग्रामीण भागात काही अधिकारी व समाजकारणी लोकांच्या पुढाकाराने स्पर्धा परीक्षा चळवळ आकाराला येत होती. मुंबईपासून शेकडो किलोमीटर दूर असणाऱ्या धुळ्यातून कितीतरी मुलं अधिकारी होतात आणि पुढे जाऊन आपल्या घराचं, गावाचं, जिल्ह्याचं नाव मोठं करतात, हे सर्व कुणाल अनुभवत होता. त्याच्या चाणाक्ष बुद्धीला हे कळायला वेळ लागला नाही कि ह्या सगळ्या प्रवासात ते विद्यार्थी आपल्या आजूबाजूच्या मुलांनाही प्रोत्साहित करत असतात. त्यामुळे तिथल्या तरुण मुला-मुलींच्या आयुष्यात आणि गावातसुद्धा विकासाच्या नव्या संधी निर्माण होत आहेत.त्यावेळी कुणालच्या मनात स्वाभाविक प्रश्न पडत होते कि हे सगळं आपल्या गावात/तालुक्यात का होऊ नये? नुसते विचार करून त्यात वेळ दवडण्यापेक्षा काहीतरी करून दाखवले पाहिजे ह्या विचाराने कुणालला पछाडले आणि इंजीनीरिंग करत असतानाच MPSCची परीक्षा उत्तीर्ण करून कुणाल अधिकारी बनला. काही वर्षे कामाचा अनुभव घेऊन कुणालने पुढे GATE ची परीक्षाही पास केली आणि इंजिनीरिंग मधल्या पदव्युत्तर अभ्यासासाठी त्याने मुंबईच्या VJTI कॉलेजला प्रवेश घेतला.

माझी आणि कुणालची भेट इथलीच. तो माझा वर्गमित्र. मला कायम कुतूहल वाटायचं कि नेहमीच एक अधिकारी होण्याची इच्छा असलेला हा माणूस पुन्हा technical  शिक्षण घेण्यासाठी का आला असेल? कारण आमच्या कॉलेजात masters करायला आलेली बहुतेक मुलं उच्च पगाराच्या नोकरीच्या अगर किमान शिक्षकाच्या नोकरीच्या आशेने आलेली होती. पण आम्हा सर्वांमध्ये कुणाल वेगळा होता. तो इथे फक्त एक अनुभव घ्यायला आला होता. नवीन मित्र जोडायला आला होता. इथल्या वातावरणात आणि लोकांमध्ये राहुन कुणाल जे शिकला ते कोणत्याही पगारात मोजता येण्यासारखं नाही. तो आम्हा सर्वांना नेहमीच म्हणतो कि आपण आपण नेहमी Best मिळवण्यासाठी धडपडायला हवं.

दरम्यान M.Tech ची डिग्री पूर्ण करत असतांनाच कुणाल बँकेचीही परीक्षा उत्तीर्ण झाला आणि सध्या एका राष्ट्रीयीकृत बँकेत अधिकारी म्हणून तो कार्यरत आहे. तयारीच्या ह्या काळात कुणाल त्याच्या आजूबाजूच्या अनेक aspirants साठी मार्गदर्शक होता. त्याचवेळी त्याच्या लक्षात आलं कि त्याच्या गावात अन परिसरात अनेक हुशार व होतकरू तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षांसाठी धडपड तर करत आहेत पण योग्य मार्गदर्शनाअभावी ते योग्य ठिकाणी पोहोचू शकत नाहीयेत. ह्यासाठी आपल्याला काही करता येईल का हा प्रश्न आता कुणालला भेडसावत होता. त्या मुलांना गावाच्या पातळीवर मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी त्याने प्रयत्न सुरु केले. त्याचवेळी त्याच्या डोक्यात विचार चमकून गेला 'मीच माझ्या परिसरातल्या मुलांसाठी एक करिअर अकादमी सुरु केली तर?' विचार तर चांगला होता पण जॉब सांभाळून, पैशाची गणित बसवून, सर्व resources manage करून हे सगळं पुढं रेटायचं म्हणजे मोठं अवघड काम. मग त्याने हा विषय अधिक समजून घेण्यासाठी इतर भागात करिअर मार्गदर्शन अकादमी चालवणाऱ्या काही लोकांसोबत चर्चा केली. त्याचबरोबर आपल्या परिसराचाही सखोल अभ्यास केला. आपल्या मनातली हि योजना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कुणाल आपल्या परिवार, मित्र-मैत्रिणी, नातलग ह्यांच्याशी चर्चा करून त्यांचीही मानसिकता तयार करत होता. सरतेशेवटी मार्च २०१७ ला सगळ्या गोष्टी जुळून आल्या. एप्रिल २०१७ मध्ये 'ध्येयासक्ती' करिअर अकादमीचा शुभारंभ झाला.

भिवंडी-वाडा रस्त्यावर अंबाडी नाका ह्या मोक्याच्या जागी एका इमारतीत कुणालने एक गाळा भाड्याने घेतला आणि रंगकाम-फर्निचरपासून.... electricity, विद्यार्थ्यांसाठी benches, कॉम्प्युटर्स व सोबत इंटरनेट connection वगैरे सर्व सोयींनी सुसज्ज अकादमी कुणालच्या श्रमातून आणि विचारांतून आकाराला आली. हि सर्व कामे अवघ्या चार दिवसांची सुट्टी घेऊन त्याने पूर्ण करून घेतली. एखाद्या गोष्टीचा मनापासून ध्यास घेतला कि माणूस कसा झपाटून कामाला लागतो हे मी त्या चार दिवसात कुणाल सोबत राहून अनुभवलं. ह्या कामात त्याला मित्रांची, परिवाराची आणि हितचिंतकांची फार मदत झाली. ह्या प्रयत्नांतून अंबाडी-वाडा-कुडूस भागातील विद्यार्थ्यांसाठी एक छोटसं का होईना पण हक्काचं ज्ञानमंदिर उभं करण्यात कुणालला यश आलं. ह्या अकादमीत कुणाल स्वतः शिकवणार आहेच पण त्याचबरोबर अनेक तज्ञ् शिक्षक सुद्धा येथे विद्यार्थ्यांच्या मदतीला असणार आहेत.

"माझ्या मागास भागाचा विकास करायचा असेल तर कार्यक्षम अधिका-यांची भक्कम फळी माझ्याच भागातून तयार करावी लागेल" ह्या कुणालच्या वाक्यात त्याची आभाळाएवढी स्वप्न तर दिसतातच पण जाणवतो दुर्दम्य आशावाद. हा आशावाद त्याच्या भागातील अनेक तरुण-तरुणींच्या स्वप्नांना येणाऱ्या काळात बळ देईल, याची मला खात्री वाटते.

स्वतःसाठी स्वप्न तर सर्वच बघतात आणि ती पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांचीच धडपड असते. पण आपल्या स्वप्नातून दुसऱ्यांच्या जीवनाला आकार देण्यासाठी धडपडणाऱ्या ह्या अवलिया कुणालला सलाम!


------------------------------
कुणाल यशवंत पाटील
ह. मु. दुगाड, ता. भिवंडी, जि. ठाणे