धडपड्या कार्यकर्ता - राजू !


राजकारण म्हणजे दल-दल, चांगल्या माणसांनी कधीही राजकारणात जाऊ नये वगेरे वगेरे आपण नेहमीच ऐकतो. गेल्या दोन तीन वर्षात मात्र परिस्थिती बऱ्यापैकी बदलली. तरुणाई पुढे येउन राजकारणावर चर्चा करू लागलीय. थोडी फार जागरुकता आलीय म्हणायला हरकत नाही. पण सगळं जाणून निव्वळ राजकारणी वाईट म्हणून विषय संपत नाही. मुळ प्रश्न आहे तसाच राहतो. राजकारणाबद्दल एकूण निराशा वाढत असताना राजूसारखे लोक पुन्हा एकदा आपल्याला ह्या system वर विश्वास ठेवण्याचं आश्वासन देतात.

राजू केंद्रे! थोडक्यात सांगायचं तर एक धडाडीचा 'कार्यकर्ता'! पिंपरी खंदारे (जि. बुलढाणा) हे त्याचं छोटंस गावं. अधिकारी बनायला बाहेर पडलेला सामान्य शेतकऱ्याचा तो मुलगा. आई वडील दोन्ही शेतात कष्ट करून त्याला शिकवणारे पण योग्य माहिती आणि मार्गदर्शनाच्या अभावामुळे त्याला शिक्षणात खूप अडचणी आल्या. त्याचवेळी राजू 'धडक मोहिमे'त सामील झाला. मेळघाट मधील कोरकू आदिवासी जमाती सोबत राहून त्याने काम केले. तिथूनच त्याला समाज परिवर्तनाची जाणीव झाली. 

माझी आणि राजूची ओळख झाली ती आमच्या College (TISS) मुळे. त्याच्या बरोबर काम करण्याची संधी मात्र मला माझ्या Research मुळे मिळाली. त्यासाठी मी त्याच्या गावी गेले होते. ऐन उन्हाळा आणि त्यात गारपिटीनं झोडपला गेलेला शेतकरी. सगळीकडे दारूण परिस्थिती होती. त्यावेळी मी आणि राजू गावोगावी फिरलो, लोकांशी बोललो, त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राजू मात्र ह्या सर्व प्रश्नांना राजकीय उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत होता. लोकांचे निवडणुकी बद्दलचे अनुभव जाणून घेण्याचा जास्ती प्रयत्न करत होता.

आम्ही ग्रामपंचायत, ग्रामसभा, लोकांचा सहभाग आणि उदासीनता, सरकारी योजना आणि त्यातल्या तृटी, राजकीय उदासीनता - ह्या आणि अशा अनेक विषयांवर भर- भरून चर्चा केली. आपल्या गावात नवीन काही तरी व्हाव म्हणून राजूची कायम धडपड पण कसे गावातले गचाळ राजकारण त्याला अडथळा वाटे, हे तो नेहमी सांगत असे. त्याने खुपदा हे बोलून दाखवले कि ह्या प्रश्नांवर दुसरे राजकीय नेतृत्व हाच पर्याय आहे. मला ते त्यावेळी खरंच खूप बालिश वाटलेलं… अगदी अशक्य वाटलेलं!

पण त्यानंतर काही महिन्यातच गावातल्या ग्रामपंचायत निवडणुक जाहीर झाल्या आणि राजुनी ह्यावेळी निवडणूक स्वतः लढायचं ठरवलं. कित्ती दिवस विरोधी बनून असलेल्या राजकारण्यांना दोष द्यायचा? त्याउलट त्याने प्रस्थापित राजकीय नेतृत्व विरुद्ध रीतसर बंड पुकारले. गावातल्या तरुणांना संघटीत केले. त्याच्या मते, 'ग्रामपंचायत हा विकासाच्या राजकारणाचा खर पाया आहे. दरवेळी ग्रामपंचायतीमध्ये स्वार्थी लोकांची घुसखोरी होऊन गाव विकासापासुन कोसो दुर जातोय. तरुणांच्याच्या हातात असलेली ग्रामपंचायत गावाला विकासाच्या वाटेने नेईल म्हणून गावातील तरुणांना संघटीत होण्याची गरज आहे.' त्यानी जाहीरपणे सांगितलं कि त्याचा हा संघर्ष सत्ता आणि संपत्ती साठी नसून गावाच्या विकासासाठी आहे. आपला निवडणूक जाहीरनामा त्याने 'Bond' पेपरवर लिहून दिला. गाव-पातळीवर आडनावाचं (जातीचं) राजकारण केलं जातं. त्याला पूर्णविराम द्यायच्या निर्धाराने, राजूने स्वत: लोकांच्या निर्णयानुसार उमेदवारी गावातल्या मागासवर्गीय वार्डात जाहीर केली. तो चिकाटीन आणि 'प्रामाणिक'पणे लढला पण शेवटी पैसा, दारू, गुंडगिरीपुढे त्याची प्रामाणिक मेहनत कमी पडली आणि राजू ती निवडणूक हरला. प्रश्न हार-जीतचा नव्हताच कधी. प्रश्न होता प्रस्थापित नेतृत्वाला आव्हाहन देण्याचा. आणि ह्यात राजू १००% यशस्वी झाला.

आपल्या पराभवालाही त्याने तितक्याच जोमाने स्वीकारलं. तो आजही जोमानी ऐकवतो - 'जितना बडा संघर्ष होगा, जीत उतनी ही शानदार होगी!'. कधीही समाज परिवर्तनाच्या तीव्र संवेदनेने भारावलेला, स्वताला अभिमानानी 'भूमिपुत्र' म्हणवणारा, मेळघाट आणि कोरकू आदिवासींच्या मुद्द्यावर कळ-कळीने बोलणारा-लिहिणारा, College मध्ये आवर्जून मेळघाटची football team आणणारा, शेतकरी आणि आत्महत्या ह्यावर अस्वस्थ होणारा,  आपल्यापरीने ह्या समाज परिवर्तनाच्या लढयात योगदान देणारा - राजू - खरंच आपल्या सर्वांसाठी आदर्श आहे!

त्याच्या ह्या धडपडीला आमचा सलाम!

--------------------
राजू केंद्रे
ह. मु. पिंपरी खंदारे,
जि. - बुलढाणा

एक मुसाफिर! #ProjectGoNtive

सध्याचा तरुण (तरुणी सुद्धा) तसा बऱ्यापैकी जागरूक झालाय. पण तरीही अजूनही आपल्यातले खूप सारे जन चाकोरी बाहेर जाऊन काही करायला हजारदा विचार करतात. दुसऱ्याबद्दल वाचून हरखून जाणारे, आवेशात येउन facebook/twitter  गाजवणारे वीर (आणि विरांगानाही) अनेक पण असतात काही वेडी माणसं- 'जो अपने दिल कि आवाज सुनते हे! और निकाल पडते हे अपने दिल के रास्तो पर '. असाच एक आमचा 'ब्लॉग मित्र' हितेश भट.

TISS तुळजापूरहून पद्व्व्युत्तर (Post Grad) शिक्षण घेतल्यानंतर सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे त्यानेही colg मधून मिळालेली placement घेतली आणि हा कानपुरिया (मूळ गाव- कानपूर) बंगलोर शहरात आला. कामानिम्मित वेग-वेगळ्या राज्यांत फिरायची त्याला संधी मिळाली. तिथेही त्याने लोकांच्या समस्या जाणून घेउन ते आपल्या लिखाणातून मांडण्याचा प्रयत्न केला. हे सगळं सुरळीत होत असतांना त्याला मात्र अस्वस्थता जाणवत होती. मनातून त्या unseen & unheard गावांना जाऊन भेटण्याची इच्छा अधिकाधिक तीव्र होत होती. आणि एक दिवस त्यानी निर्णय घेतला, आपल्या नोकरीचा राजीनामा देण्याचा. नोकरी सोडून त्याने थेठ गाठले उत्तराखंड, तेव्हा पासून त्याचा आणि 'ProjectGoNative' चा हा प्रवास सुरु झालाय. अनोख्या जागांना भेटी देऊन तो तिथल्या लोकांचे कष्ट, दैनंदिन समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय.

हितेश रोजच्या रु.३०० बजेटनी भारतभर हिंडतोय. वेगवेगळ्या लहान, दुर्लक्षित खेड्यांना भेटी देत, नव-नवीन लोकांना सोबत त्याचा हा प्रवास सुरु आहे. निसर्गाच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा तो प्रयत्न करतोय, त्याचे अनुभव लिहितोय आणि माझ्या सारख्या असंख्य लोकांना Inspire करतोय. तुम्हालाही इच्छा असेल तर त्याच्या ह्या प्रवासात तुम्हीही सहभागी होऊ शकता.

चौकटी बाहेर जाऊन स्वतःच्या मनाला पटतं म्हणून 'प्रवास' करणाऱ्या हितेशच्या ह्या साहसी निर्णयाला माझा सलाम आणि त्याच्या नाविन्यपूर्ण प्रवासाला शुभेच्छा!

हितेशच्या initiative बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी वाचा - https://thosethreedots.wordpress.com/about/


--------------------
हितेश भट
ह.मु . - निसर्गाच्या कुशीत

राजा होण्यासाठी आलोय!


जगण्याची रोज असामान्य धडपड पण त्यातही नियमांनी जगणारी माणसं विरळ! स्वतःच्या गरजेइतक राखून बाकीच इजा न करता ह्या निसर्गाला परत करनं, खरच आपल्यातल्या किती जणांना जमतं?
**************************************************************************

आमचा एक गृप आहे, शाळेत असतानाचा. सगळ्यांचा असतो तसाच. कुणी मस्तीखोर, कुणी अभ्यासू, कुणी सामाजिक बांधिलकी जपणारे, कुणी शांत तर कुणी  सगळ्या खबरी ठेवणार. तसे जवळजवळ सगळे फुकटच.
बस, वीक् एण्ड्ला भेटायच. तेही  ठाण्याच्या सुप्रसिद्ध उपवनमधे ( काहींच्या मते कुप्रसिद्ध). भेटायच म्हणजे  गप्पागोष्टी , धिंगाणा आणि रात्रीचे जेवण ओघाने आलं पण त्या दिवशी ही भेट खुप काही शिकवण देणारी ठरली. तलावाच्या बाहेरील बाजूला आमचा धिंगाणा चालू होता आणि आतील बाजूला (वय वर्ष  ते १०) काही मुले मासेमारीच्या उद्योगात गुंग होती. शेजारच्या बाजारात मासे विकणारी असावीत बहुतेक. परंतु विशेष लक्ष वेधत होता तो त्यांच्यामध्ये असलेला एक लहान मुलगा.  खाकी पँट, मळकट लाल सदरा आणि चेहऱ्यावर धीरगंभीर भाव आणि कामातील एकाग्रता. पण कुतूहल वाटले ते त्याच्या मासेमारी करण्याच्या पद्धतीचे, खरे तर त्याने प्रत्येक वेळी पाण्यात टाकलेल्या गळाला मासे लागत होते. परंतु तो त्यातील निवडकच आपल्या जवळ ठेवत होता बाकीचे पुन्हा पाण्यात सोडत होता. शेवटी आमच्यामधील एकाने विचारले 'काय रे? तुला मासे तर भेटत आहेत, मग पुन्हा पाण्या का सोडतो आहेस?' काहीशा ना-खुशीतच त्याने वर पाहिले आणि उत्तरला 'मला फक्त मोठे मासे हवेत' आणि तो आपल्या कामाला लागला. आमच्या मित्राने पुन्हा विचारले 'का? विकणारच आहेस ना! मग ने की सगळे'. तो मुलगा पुन्हा उत्तरला, 'नाही. हे मला माझ्यासाठी हवेत'. हे सगळं एकणारा आमचा दुसरा मित्र उद्गारला ' मित्रा तुच राजा होशील '.
मला अगदी त्याच्याच वयाचे असणारे आणि राज्याच्या प्रश्नाला आत्मविश्वासाने उत्तर देणारे शाहू महाराज आठवले 'राजा होण्यासाठी आलोय!'. अशीच करोडो सामान्यातील, 'असामान्य' लहानगी आपल्या देशात आहेत ज्यांच्यात हिम्मत आहे, आपले आयुष्य आपल्या Terms & condition वर जगण्याची!

--------------------
तळ्यावरचा मित्र, ठाणे
[हा लेख आम्हाला आमच्यावाचक पुजा प्रभाकर ह्यांनी लिहून पाठवलाय.
धन्यवादपुजा.]




रानफुल!



मी आणि पंकज प्रत्येक शनिवारी आणि रविवारी School Without Wall अंतर्गत आदिवासी मुलांना शिकवायला 'पंडिता शाळा, येउर' येथे जात असू. ठाणे शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं हे गावं. त्यालाच ठाण्याचे महाबळेश्वरही समजल जात. दुचाकी स्वार, प्रेमीयुगुल यांची त्यामुळे इथे नेहमीच गजबज असते. तसा हा भाग संजय गांधी उद्यानात समाविष्ट आहे. ह्या उद्यानाचा अविभाज्य भाग म्हणजे वर्षानुवर्षे इथे राहणारे, आदिवासी. जंगल हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. मुंबई अगर ठाणे यांसारखी शहरं हाकेच्या अंतरावर असली तरी जंगलच त्यांचं घर. प्रगती आणि विकासापासून दूर असणारे हे आदिवासी मनाने मात्र श्रीमंत. ह्या माळरानावर मला अनेक जण भेटले. काही जंगलातील हवे सारखे स्वच्छंदी तर काही माळरानावर फुलणाऱ्या फुलांसारखी निरागस तर काही आभाळा एवढं हृदय असलेलीमाणसं छोटी, डोंगर एवढी!
त्यात आवर्जून लक्षात राहिली ती उषा. उषा ही इयत्ता सातवीत शिकणारी मुलगी. सावळा रंग पण हसरा असा तिचा चेहरा अजूनही डोळ्यात तरळून जातो. आई वडील आणि सहा भावंड अशा मोठ्या कुटुंबात ती राहते. आई-वडिलांसोबत जंगलात शेती करण, लाकड गोळा करण हा तिचा दिनक्रम. यातून थोडा वेळ मिळाला तर शाळा. तरी तिला शाळा खूप आवडते. शाळा आणि जंगल या पलीकडे ती रमते ते तिच्या कवितांमध्ये. जंगलात फिरताना येथील माणसांवर आणि निसर्गावर केलेल्या कविता ती आठवून आठणून वहीत उतरवून ठेवते. अभ्यासात सामान्य असणारी उषा कविता मात्र असामान्य रचते. त्यातून ती आदिवासींचं जंगलाशी नातं दाखवते तर कधी बदलणारे ऋतू अनुभवते. तीच्या इतक्याच स्वच्छंदी आहेत तीच्या कविता.
हे सारं करतांना उशाला काळजी आहे ती विरळ होत जाणाऱ्या जंगलाची. 'हे जंगल विरळ होत, संपून तर जाणार नाही ना?'  अशीच चिंता तिला नेहमी सतावत असते. प्रत्येक ऋतूत घर बदलतांना हरवलेल्या आपल्या कवितांच्या पानांसारखी हि निसर्ग सृष्टी तर नाही ना हरवणार? हाच प्रश्न भेडसावत असावा तिला. म्हणतात ना दिव्याखाली अंधार. तसच काही झालय येउरच. जंगलात होत असणारे मानवनिर्मित बदल आणि अतिक्रमण उषाला आणि  तिच्या सारख्या सर्वांनाच त्यांच्याच जंगलात असुरक्षित करत आहेत. तेरा वर्षाची उषा. आज उषा कडे जुन्या कविता तर नाहीत, पण जंगल आहे आणि तिला ते जपायचंय. मी तिला शिकवायला जायचे पण खरतर तिने अन ह्या 'बिन भिंतीच्या शाळेन' मला खूप काही शिकवलं.
आज 'अच्छे दिन' आणण्याच्या प्रयत्नात आपण दुसऱ्या कोणाचे 'अच्छे दिन' तर  हिरावून तर घेत नाही आहोत ना? ह्यावर चिंतन करण्याची गरज आहे आपल्या सर्वांना. आजही ७० % भारत खेड्यात राहतो आणि तिथला आदिवासी जंगलात. जे एका चिमुरडीला  समजल ते आपल्याला का म्हणून नाही कळावं?
------------------------------------------------------------
उषा
. मु. पंडिता शाळा, येउर

[हा लेख आम्हाला आमच्या वाचक पुजा प्रभाकर ह्यांनी लिहून पाठवलाय. धन्यवाद पुजा.]