रानफुल!



मी आणि पंकज प्रत्येक शनिवारी आणि रविवारी School Without Wall अंतर्गत आदिवासी मुलांना शिकवायला 'पंडिता शाळा, येउर' येथे जात असू. ठाणे शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं हे गावं. त्यालाच ठाण्याचे महाबळेश्वरही समजल जात. दुचाकी स्वार, प्रेमीयुगुल यांची त्यामुळे इथे नेहमीच गजबज असते. तसा हा भाग संजय गांधी उद्यानात समाविष्ट आहे. ह्या उद्यानाचा अविभाज्य भाग म्हणजे वर्षानुवर्षे इथे राहणारे, आदिवासी. जंगल हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. मुंबई अगर ठाणे यांसारखी शहरं हाकेच्या अंतरावर असली तरी जंगलच त्यांचं घर. प्रगती आणि विकासापासून दूर असणारे हे आदिवासी मनाने मात्र श्रीमंत. ह्या माळरानावर मला अनेक जण भेटले. काही जंगलातील हवे सारखे स्वच्छंदी तर काही माळरानावर फुलणाऱ्या फुलांसारखी निरागस तर काही आभाळा एवढं हृदय असलेलीमाणसं छोटी, डोंगर एवढी!
त्यात आवर्जून लक्षात राहिली ती उषा. उषा ही इयत्ता सातवीत शिकणारी मुलगी. सावळा रंग पण हसरा असा तिचा चेहरा अजूनही डोळ्यात तरळून जातो. आई वडील आणि सहा भावंड अशा मोठ्या कुटुंबात ती राहते. आई-वडिलांसोबत जंगलात शेती करण, लाकड गोळा करण हा तिचा दिनक्रम. यातून थोडा वेळ मिळाला तर शाळा. तरी तिला शाळा खूप आवडते. शाळा आणि जंगल या पलीकडे ती रमते ते तिच्या कवितांमध्ये. जंगलात फिरताना येथील माणसांवर आणि निसर्गावर केलेल्या कविता ती आठवून आठणून वहीत उतरवून ठेवते. अभ्यासात सामान्य असणारी उषा कविता मात्र असामान्य रचते. त्यातून ती आदिवासींचं जंगलाशी नातं दाखवते तर कधी बदलणारे ऋतू अनुभवते. तीच्या इतक्याच स्वच्छंदी आहेत तीच्या कविता.
हे सारं करतांना उशाला काळजी आहे ती विरळ होत जाणाऱ्या जंगलाची. 'हे जंगल विरळ होत, संपून तर जाणार नाही ना?'  अशीच चिंता तिला नेहमी सतावत असते. प्रत्येक ऋतूत घर बदलतांना हरवलेल्या आपल्या कवितांच्या पानांसारखी हि निसर्ग सृष्टी तर नाही ना हरवणार? हाच प्रश्न भेडसावत असावा तिला. म्हणतात ना दिव्याखाली अंधार. तसच काही झालय येउरच. जंगलात होत असणारे मानवनिर्मित बदल आणि अतिक्रमण उषाला आणि  तिच्या सारख्या सर्वांनाच त्यांच्याच जंगलात असुरक्षित करत आहेत. तेरा वर्षाची उषा. आज उषा कडे जुन्या कविता तर नाहीत, पण जंगल आहे आणि तिला ते जपायचंय. मी तिला शिकवायला जायचे पण खरतर तिने अन ह्या 'बिन भिंतीच्या शाळेन' मला खूप काही शिकवलं.
आज 'अच्छे दिन' आणण्याच्या प्रयत्नात आपण दुसऱ्या कोणाचे 'अच्छे दिन' तर  हिरावून तर घेत नाही आहोत ना? ह्यावर चिंतन करण्याची गरज आहे आपल्या सर्वांना. आजही ७० % भारत खेड्यात राहतो आणि तिथला आदिवासी जंगलात. जे एका चिमुरडीला  समजल ते आपल्याला का म्हणून नाही कळावं?
------------------------------------------------------------
उषा
. मु. पंडिता शाळा, येउर

[हा लेख आम्हाला आमच्या वाचक पुजा प्रभाकर ह्यांनी लिहून पाठवलाय. धन्यवाद पुजा.]

No comments:

Post a Comment